Pages

पारधी समाज विकासाचा तरुणांचा संकल्प

पुणे - अंधश्रद्धा, अस्वच्छता, अज्ञान यामुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्‍न; तसेच समाजातील महिलांना मिळणारी अमानवी वागणूक अशा विचित्र परिस्थितीत पारधी समाज वाटचाल करत आहे. शिक्षण आणि रोजगारापासून कोसो दूर असणाऱ्या या समाजाला सुधारायचे असेल, तर प्रत्येक गावाने किमान एका कुटुंबाचा विकास केला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन या समाजामध्ये सुधारणा घडवू पाहणाऱ्या नामदेव भोसले या सृजनशील तरुणाने केले आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष म्हणून भोसले काम करतात. त्यांचे बंधू भास्कर यांनी लेखणीच्या माध्यमातून या समाजाचे दुःख, अंधश्रद्धा याला वाचा फोडली आहे. निधर्मी, ऋतुप्रीत हे कवितासंग्रह, "दैना' या कादंबरीनंतर भास्कर यांचे "वेदना' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. नामदेव भोसले विविध गावात जाऊन ही पुस्तके पोचवतात आणि जागृती घडविण्याचा प्रयत्न करतात. 

पारधी समाजात आजही कमालीची अंधश्रद्धा आहे, असे नामदेव भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, ""पोलिसांना घाबरून पारधी लोक गावापासून दूर राहतात. गावात मिसळल्याशिवाय शिक्षण, सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. समाजातील 80 टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. प्रत्येक कुटुंब गुढीपाडवा व दिवाळीदरम्यान देवदेव करते. काळे, भोसले, चव्हाण बोकडांचा; तर शिंदे, पवार टोणग्याचा बळी देतात. असे बोकड किंवा रेड्यावर महिलांची सावली पडणेही पाप मानले जाते.'' 

समाजाबाहेर याबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे कोणी लक्ष देत नाही. या गोष्टी जगासमोर आल्या तर सुधारणांसाठी प्रयत्न केले जातील, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""आदिवासींसाठी सरकार लाखो रुपयांचा निधी देते; पण आमच्यापर्यंत काहीच पोचत नाही. जातीचे दाखले काढायला 50 वर्षांचा पुरावा मागितला जातो; पण आमच्याकडे 10 वर्षांचासुद्धा शिक्षणाचा दाखला नाही. गुन्हेगारीचा इंग्रजांनी मारलेला शिक्का अजूनही पुसला नाही. पुणे जिल्ह्यात 27 ते 28 हजार कुटुंबे असूनही केवळ 700 ते 800 कुटुंबांचीच रहिवासी म्हणून नोंद असेल.'' 

आईने दिली प्रेरणा... गुन्हा नसतानाही वडिलांना 10-12 वेळा तुरुंगवास भोगावा लागला, असे सांगून भोसले म्हणाले, ""वडिलांना जामीन मिळविण्यासाठी आई सगळ्यांसमोर हात पसरायची; पण कोणी मदत केली नाही. एकदा पोलिसांनी आईलाच जोरात मारले. त्या वेळी तिने फोडलेली किंकाळी अजूनही मनातून जात नाही. समाजात जगायचे तर प्रतिष्ठा पाहिजे, त्यासाठी शिकले पाहिजे, हे स्वप्न आईने दाखवले. तिचे कष्ट कमी होण्यासाठी शिकलो. शिक्षण अर्धवट राहिले तरी समाज सुधारला पाहिजे म्हणून काम करत आहोत.''

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari