Pages

पारधी- कातकऱ्यांना मिळणार हक्काचा निवारा

सातारा - दुर्लक्षित राहिलेल्या पारधी कातकरी समाजाला आता हक्काचा निवारा मिळणार आहे. पारधी- कातकरी पुनर्वसन योजनेत जिल्ह्यातील 221 कुटुंबांना प्रत्येकी एक गुंठे जागा देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये पाच तालुक्‍यांतील 137 पारधी कुटुंबे, तसेच चार तालुक्‍यांतील 84 कातकरी कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे.

स्वातंत्र्यानंतरही देशातील काही जाती जमाती आजही मागासलेपणाने वावरत आहेत. अशा मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी राज्य व केंद्र शासनाने विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असले, तरी आजही पारधी- कातकरी समाज दुर्लक्षित आहे. केवळ कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण नसल्याने या समाजातील लोकांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. डोक्‍यावर हक्काचे छप्पर नसल्याने आयुष्यभर इकडून तिकडे भटकंती करत हा समाज वावरत असतो. त्यातच भर म्हणजे गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने समाजाकडून हेटाळणी होते. त्यामुळे आजही या समाजाचा विकास झालेला नाही. पारधी मुक्ती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याशी संपर्क साधून सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यात पारधी आणि कातकरी कुटुंबांना ते राहात असलेल्या ठिकाणी एक गुंठा जागा देण्याची मागणी केली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देत पारधी- कातकरी पुनर्वसन योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबांना जागा देण्यास मान्यता दर्शवत तसा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांमार्फत महसूल व वन विभागाकडे पाठविला आहे. 

या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर आदिवासी विभागाकडून विशेष घटक योजनेसह विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील सातारा, फलटण, खटाव, खंडाळा आणि माण या पाच तालुक्‍यांत 137 पारधी कुटुंबे आहेत, तर जावळी, सातारा, पाटण आणि खंडाळा या चार तालुक्‍यांत 84 कुटुंबे कातकरी समाजातील आहेत. या सर्व 221 कुटुंबांना आता एक गुंठे जागा मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी पारधी- कातकरी समाजातील कुटुंबे ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना तत्काळ ग्रामपंचायत अथवा ते राहात असलेल्या ठिकाणी नमुना आठला नोंद करून त्यांना उतारे द्यावेत, असे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभरात ही कार्यवाही पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

सर्वाधिक लाभ फलटण तालुक्‍याला
या योजनेचा लाभ सातारा तालुक्‍यातील 16 पारधी कुटुंबांना होणार आहे, तर सर्वाधिक लाभ फलटण तालुक्‍यातील 78 पारधी कुटुंबांना होणार आहे. त्याबरोबर खटाव 23, माणमधील 14 कुटुंबांना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील 137 पारधी कुटुंबांना एक गुंठेप्रमाणे जागा मिळणार आहे, तसेच चार तालुक्‍यांत 84 कातकरी समाजाची कुटुंबे असून, पाटणमध्ये सर्वाधिक 33 कुटुंबे आहेत, तसेच खंडाळा 32, सातारा 13, जावळीत सहा कुटुंबे आहेत. या सर्वांना हक्काचा निवारा मिळणार आहे.

Original at : http://www.esakal.com/esakal/20091219/5102161608786534411.htm

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari