Pages

पारधी समाजासाठी राज्यात 900 घरे

सोलापूर - पारधी समाजासाठी शासनाच्या वतीने राज्यात 900 घरे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे दिली. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेत आयोजिलेल्या बैठकीसाठी ते आले होते. आमदार विजय देशमुख, आमदार दिपक साळुंके या वेळी उपस्थित होते. बैठकीनंतर श्री. ढोबळे यांनी ही माहिती दिली. 

श्री. ढोबळे म्हणाले, 'या योजनेसाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात 80 ते 90 घरे बांधण्यात येणार आहेत. माढा तालुक्‍यात काही दिवसांपूर्वी पारधी समाज वस्तीतील घरे जाळण्याचा प्रकार झाला होता. त्या घटनास्थळीही भेट दिली आहे. नव्वद टक्के लोकांना सुखाने जगायचे असेल तर विचलित असलेल्या दहा टक्के विचलित लोकांची व्यवस्था करणे आवश्‍यक आहे. त्यानुसारच हे धोरण आखण्यात आले आहे.'' 
""राज्यातील 41 तालुक्‍यांत 897 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व बाजूंनी पाण्याची कमतरता होत आहे. त्यामुळे रोज शंभर हापसे बंद पडत आहेत. सध्या असलेल्या टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या आदीत आणखीन भर पडण्याची शक्‍यता आहे. जुलैअखेरपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत'', असेही श्री. ढोबळे यांनी सांगितले. 

चिमणीचे भान ठेवा... टंचाईचा फटका फक्त माणसालाच नाही, तर पशुपक्ष्यांनाही बसला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गच्चीवर पशुपक्ष्यांसाठी एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. चिमणीच्या पिलाची चोच पाण्यावाचून रिकामी राहू नये, याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन श्री. ढोबळे यांनी या वेळी केले.

Original at : http://www.esakal.com/esakal/20111126/4743701803651548283.htm

Save Nature Save Ourselves!

Save Nature Save Ourselves!

Reach us @Facebook

Reach us @G+

Daina - Kadambari